परवा सकाळी वडाळे तलावाच्या जवळून जाताना मधूर स्वर कानावर पडले. अहाहा.... किती प्रसन्न वाटलं. सूर्य नुकताच वर येतांना दिसतोय आणि तुम्ही स्वरांच्या लहरीत धुंद झालेले आहात. हा अनुभव स्वतः घेतल्या शिवाय त्याची मधुरता तुम्हाला कळूच शकत नाही. गाणं, स्वर, ताल, वाद्य, ठेका, रागगायन, आलाप, ताना या सगळ्यांचा अगदी जवळचा संबंध तुमच्याशी असेल तर तुम्हाला वेगळ्या मेडिटेशनची आणि दुसऱ्या कशाची गरजच भासणार नाही.तुम्ही आणि तुमचं संगीत, रियाज ह्यात न कंटाळता अगदी तासनतास तुम्ही आनंदाने वेळ घालवू शकता.असं म्हणतात, देवांना सुद्धा गाणं खूप आवडतं. तुमच्यात गाणं म्हणण्याची कला असणे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे यासारखे भाग्य दुसरे कुठलेच नाही.आपल्या भारतात किंवा इतरही देशात जेवढे गायक आहेत, त्यांना ही दैवी देणगीच मिळालेली आहे असेच म्हणायला हवे. आपल्याकडच्या कुठल्याही शुभ कार्यात संगीत असतंच. रात्री सगळे झोपले आहेत,तुम्ही बसले आहात,संपूर्ण शांतता आहे आणि अशावेळी कोणी गिटारवर एखाद्या गाण्याचं music वाजवलं तर काय खास वाटतं, ते तुम्ही स्वतः त्या अनुभवातून गेल्यावरच कळेल. म्हणूनच म्हणते जीवनात संगीताला (म्हणजे गाण्याला, स्वरांना ) जवळ करा आणि आत्मानंदात तल्लीन होऊन जा. कितीही गाणी ऐकली आणि म्हटली तरी त्याचा अभ्यास कायम अपूर्णच असतो . म्हणूनच तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खूप शिकत राहणे यासारखं दुसरं सुख आणि समाधान नाही आणि यासारखा दुसरा आनंद कुठेच आणि कशातच मिळणार नाही.जीवन आहे तर संगीत आहे आणि संगीत आहे म्हणूनच जीवन आहे हे विसरू नका.
Comments