top of page
Writer's pictureRtn Asmita Acharya

श्रावण सरी

दर वर्षी श्रावण महिना आपण काहीतरी वेगळे करून साजरा करतो. मग ते केळीच्या पानावरचे जेवण असो किंवा मंगळागौरीचे खेळ असो. पण यावर्षी प्रे. योगिताच्या डोक्यात काहीतरी हटके कार्यक्रम असावा अशी कल्पना आली आणि ती तिने आपल्या विनयाला बोलून दाखवली. मग काय विचारता .' शुभस्य शिघ्रं ' . लगेच मॅडम कामाला लागल्या आणि तिने तिच्या सखी ग्रुप मधील नीलिमा आणि वैशाली यांच्या सोबत मीटिंग घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली सुद्धा.


नीलिमाने अप्रतिम असे लिखाण केले आणि वैशालीची संकल्पना आणि दिग्दर्शन. कार्यक्रमाचे नाव ठरले ' श्रावणसरी '. सखी ग्रुपच्या नऊ जणी आणि आपल्या विनया, रूपा आणि शुभद अशा तिघी मिळून बरा जणींची जवळ जवळ दीड ते दोन महिने जोरदार तालीम सुरू होती. शेवटच्या आठवड्यात दोन दिवस तालीम बघायला जायचा योग आला होता तेव्हाच लक्षात आले होते की इतके दर्जेदार लिखाण जोडीला वैशालीचे खुमासदार निवेदन आणि काटेकोर दिग्दर्शन म्हणजे कार्यक्रम नक्कीच रंगतदार होणार.


बघता बघता आठ तारीख आली म्हणजे कार्यक्रमाचा दिवस उजाडला. इतके दिवस दडी मारलेल्या वरुण राजाचे बरोबर त्याच दिवशी दणक्यात पुनरागमन झाले होते. श्रावणसरी बरसू लागल्या होत्या. उत्साह वाढला. संध्याकाळी हॉल वर आलो तर अतिशय प्रसन्न वातावरण होते. सगळ्या कलाकार पैठणी साड्या आणि डोक्यात गजरे माळून तयार होत्या. आपल्या क्लब मधील महिला वर्ग आणि पाहुणे मंडळी देखील नटून थटून आली होती. रोटरी क्लब ऑफ Panvel Symphony, Panvel Elite आणि पाताळगंगा क्लब अशी तीन क्लब मिळून synergy meeting असल्यामुळे जवळ जवळ 70 इतका प्रेक्षक वर्ग उपस्थित होता. मजा येणार होती नक्की.


बरोबर सव्वा आठ वाजता प्रे . रो. आदित्य ने मीटिंग called to order केली. प्रे. रो. योगिताने थोडक्यात हितगुज केले आणि विनायाने प्रस्तावना करून वैशाली केतकर कडे कार्यक्रमाची सर्व सूत्र सोपवली. श्रावण महिन्याचे महत्त्व सांगून भगवान शंकराची प्रार्थना करून नंतर ' शंभो शंकरा ' या गाण्याने कार्यक्रम सुरू झाला. पांढऱ्या फुलांनी सजवलेली शंकराची पिंडी, वरती बेलाचे पान. वातावरण निर्मिती छानच झाली होती. मग नागपंचमी पासून सुरुवात होऊन पुढे रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, गोपाळकाला,मंगळागौर, बैल पोळा, पिठोरी अमावस्या, मातृदिन असे एक एक सण आणि खेळ सादर केले गेले. प्रत्येक सणाचे महत्त्व त्याचे निवेदन, सख्यानी पुढे येऊन सांगितलेली माहिती किंवा सादर केलेली नृत्ये आणि गाणी यातून त्या त्या सणाचे आणि खेळाचे महत्त्व आमच्या पर्यंत अतिशय सुंदर रित्या पोहोचत होते. उत्साही प्रेक्षक सुद्धा मनसोक्त टाळ्या ( कधी कधी शिट्ट्या पण) वाजवून कलाकारांचा उत्साह वाढवत होते. मातृदीनाचे महत्त्व सांगणारी ग दि माडगूळकर यांची कविता आणि तिचे सादरीकरण तर अप्रतिम. डोळ्यात पाणी आले बघताना. जवळ जवळ पन्नास मिनिटांचा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम झाला.


एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कार्यक्रमासाठी लागणाऱ्या बारीक सारीक गोष्टींचा देखील सगळ्यांनी विचार केला होता आणि त्या सगळ्या त्यांनी स्वतः हाताने बनवल्या होत्या. जसे की शंकराची पिंड, दिवे, बैल जोडी, नाग, राखी. Hats off to the team 🙏🙏. चित्रांची आणि गाण्यांची निवड देखील उत्तम. या सगळ्या गोष्टी होत्या म्हणूनच इतका बहारदार कार्यक्रम झाला हे नक्की.


बघताना एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली कि असे कार्यक्रम सादर झालेच पाहिजेत आणि आताच्या तरुण पिढीने ते बघायला हवेत तरच आपली संस्कृती आपले रीतिरिवाज हे पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतील नाहीतर सगळ्याच गोष्टी कालबाह्य होऊन जातील.


ज्या सर्व कलाकारांनी आणि पडद्या मागच्या लोकांनी मेहनत घेतली त्यांचे मनःपूर्वक आभार आणि ज्यांनी हा कार्यक्रम miss केला ते एका मनमुराद आनंद घेण्यापासून वंचित राहिले हे नक्की.

87 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page