प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा; कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही...... असाच काहीसा अनुभव मला ऐन दिवाळीत आला. आमची सोसायटीची पाच मजली इमारत. त्यात २२ कुटुंब राहतात. सगळ्यांकडे दिवाळीची लगबग सुरू होती. माझी पण दिवाळीची तयारी फारच उत्साहात सुरू झाली. घर सजवण्यापासून ते फराळ, रांगोळी वगैरे सर्वच तयारी झाली. रोज रांगोळी काढायला वेळ नसतो; पण दिवाळीत सकाळ संध्याकाळ जमेल तितकी मोठी रांगोळी काढायचा माझा अट्टाहासच असतो. माझं घर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. या घराने मला पुष्कळ गोष्टी शिकविल्या. या घरात आल्यापासून सुख जणू माझ्या पायाशी लोळतच होते. सुयोगचा प्रगतीचा आलेख वर वर चढतच गेला. लक्ष्मीचा वरदहस्त जणु माझ्याच कुटुंबावर आहे. माझं घर हे माझ्या साठी मंदिरच होतं.
दिवाळीचे दिवस अगदी आनंदात, उत्साहात गेले.....पण ती भाऊबीजेची संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी दारात रांगोळी काढली, पणत्या लावल्या. सुयोग भाऊबीजेला जायला निघाले होते, मला चलण्यासाठी आग्रह करत होते; पण मला घरातून बाहेर जावसचं वाटतं नव्हतं. मी, आई आणि बाबा घरात छान गप्पा मारत बसलो होतो आणि इतक्यांत भूकंप झाल्यासारखं घर हादरलं, थोडावेळ काही कळलंच नाही. मी बाहेर येऊन आधी पणत्या विझविल्या. वाटलं, कुठलातरी फटाका फुटला असेल, कोणाला काहीच कळतं नव्हतं. तेवढ्यातच माझी शेजारीण रडत बाहेर आली आणि बोलली नानाजी गिर गए. मला वाटलं, चक्कर आली असेल; पण घरात जाऊन बघितल्यावर माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, नानाजी चौथ्यामाळ्यावरून खालच्या घरात पडले होते, म्हणजे चौथ्या माळ्यावरील नानाजींच्या घरातील flooring तुटून तिसऱ्या माळ्यावरील ceiling तुटून ते खाली पडले होते. असं दृश्य, जे आजपर्यत फक्त सिनेमातंच पाहिलं होतं, ते बघून पूढे जाण्याची हिम्मतच होत नव्हती. माझे हात पाय तर गारचं पडले होते. आवाजाने सोसायटीतील इतर लोकही जमा झाली, पण ज्या घरात नानाजी पडले त्या घराला कुलुप होते. नानाजींच काय झालं असेल काही कळायला मार्ग नव्हता. सोसायटीचे सेक्रेटरी त्यावेळीं लगेचच धावत आले, शिडी लावून खाली उतरून त्यांनीं दहा मिनिटात नानाजींना बाहेर काढले. नानाजींना सुखरूप बघुन सगळ्यांच्या जीवात जीव आला. घाबरलेले होते पण देवाची कृपा म्हणून त्यांना जास्तं काही मार लागला नाही.
या धावपळीत माझी रांगोळी पूर्ण विस्कटूनच गेली नाही तर माझं मनही विस्कटून गेलं. अग्निशमन दल, पनवेल नगरपालिका अधिकारी लगेच आले आणि त्यांनी पूर्ण सोसायटी रिकामी करण्याकरता सांगितलें. सोसायटी सील करण्यांत आली. काहीच सुचत नव्हतं....असं कसं माझं घर मी सोडून जाणार? कालपर्यंत मी माझ्या घरात होते आणि आज हे काय घडलं काहीच कळत नव्हतं.... घर सोडण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. सोसायटीतील प्रत्येकाची हीच अवस्था होती. ती रात्र प्रत्येकाने आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे जाऊन काढली. आम्ही पण माझ्या दिराकडे गेलो. पूर्ण रात्र जागेच होतो.....काही कळत नव्हतें, आता पुढे काय होणार काहीच समजत नव्हतें. सकाळ झाल्यावर सगळेच सोसायटीच्या आवारात जमा झाले पण अधिकाऱ्यांकडून Structure Audit Reports आल्याशिवाय काहीच होऊ शकत नव्हते........
कुटूंब म्हणजे केवळ रक्ताचं नात नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटूंब. अशा कठिण प्रसंगी माझ्यासाठी धावून आलं ते माझं रोटरी सिम्फनीचं कुटूंब. मानसीने तर तिचं घरच माझ्यासाठी खुले ठेवलं होतं. स्वप्निल दिवसभर सुयोगसोबतच होता अगदी भावाप्रमाणे.....प्रशांत वृशाली त्यांच्या घराची किल्ली घेऊन तयारच होते. धुमाळ सरांनी तर खूपच मदत केली, त्यांनी स्वतः येऊन सोसायटीची पाहणी केली. त्यांच्या एका शब्दावर आम्हांला राहण्यासाठी दुसरे घर लगेचच मिळाले तेही अगदी आमच्या सोसायटी जवळ.. सिम्फनी कुटुंबातील प्रत्येकाने अगदी आपुलकीने आमची चौकशी केली. खरचं त्यावेळीं मनाला खूप आधार वाटला. ह्या जगांत कोणतीच गोष्टी कायम टिकणारी नाही, आपल्या दुःखाचं पण काहीसं असंच असतं.दुःख सुद्धा फक्त काही काळासाठीच असतं; आपण फक्त हिम्मत ठेवली पाहिजे.
सिम्फनी कुटुंबासारखी मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्याजवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठें असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
Comments